

शांतिदूत सादाकोची गोष्ट
६ ऑगस्ट १९४५ हा जपान मधील लोकांसाठी सर्वसाधारणच दिवस होता. युद्ध सुरू असल्याने मनात भीती होतीच आणि ते जिंकण्याची खात्री देखील. त्यामुळेच की काय हे युद्ध लवकरात लवकर जिंकायचं ही भावना प्रत्येक जपानी सैनिकाच्या, नागरिकांच्या मनात होती. त्यासाठी अतिशय चिवट झुंज देत त्यांची वाटचाल देखील सुरू होती. पण निसर्ग नियमांना मानवी अस्तित्वालाच आव्हान देणारी एक घटना यावेळी घडली. आकाराने खूप लहान परंतु अतिसंहारक अशा अण्वस्त्रांचा त्यावेळी प्रथमच वापर केला गेला. विज्ञान आणि तंत्रज्ञानात मानवाने केलेली प्रगती ही आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी की संपवण्यासाठी या प्रश्नाचा इथे जन्म झाला. केवळ हा एक प्रश्नच नव्हे तर अनेक आक्रोशांची, मरणप्राय यातनांची ती सुरुवात होती. अणुबॉम्बच्या स्फोटानंतर झालेल्या अतितीव्र किरणोत्सारामुळे हजारो जपानी नागरिक होरपळून मृत्युमुखी पडले. अनेक जण लुळे पांगळे झाले, अंध झाले. या यातनांचा अजूनही शेवट झालेला नाही कारण आजही त्यांची तिसरी-चौथी पिढी त्या संहाराचे दुष्परिणाम भोगते आहे.
या घटनेनेच आपल्याला मैत्री, स्नेह, सद्भावना आणि अहिंसा या जीवनमूल्यांची प्रकर्षाने जाणीव करून दिली. त्याच कालावधीत एका १०-११ वर्षाच्या मुलीच्या सादाको सासाकीच्या गोष्टीने जगभरातील अनेक शांतता प्रेमी नागरिक, कलाकार शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. अणुसंहाराच्या वेळी सादाको केवळ दोन वर्षांची चिमुरडी होती. थोडी मोठी झाल्यावर शाळेत अभ्यासाबरोबरच खेळामध्येही तिचं नाव सदैव अग्रेसर असायचं. तिच्या वर्गातर्फे रिलेसाठी तिची निवड झाली होती. आता शाळेतील स्पर्धा जिंकायची असा तिने निश्चय केला कारण त्यानंतर तिची ज्युनिअर हायस्कूलच्या टीम मध्ये निवड होणार होती. तिची ही इच्छा तिने अनेकदा बोलून देखील दाखवली होती. एके दिवशी नेहमीप्रमाणे सादाको भल्या पहाटे उठून धावण्याचा सराव करीत असताना तिला जोराची चक्कर आली. ती जमिनीवर कोसळलीच. तिच्या शिक्षकांनी जाऊन तिला उचललं. तिच्या वडिलांना बोलवण्यात आलं. ते सादाको ला रेड क्रॉस च्या दवाखान्यात घेऊन गेले. त्या हॉस्पिटलचा एक विभाग खास करून ॲटम बॉम्ब मुळे आजारी पडलेल्या रुग्णांसाठी होता. काही वेळातच संबंधित चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आणि सादाकोला ल्युकेमिया; रक्ताचा कर्करोग झाल्याचं सांगण्यात आलं. सादाको ती भयंकर बातमी ऐकून हादरून गेली. तिला माहिती होतं की एकदा लोक या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले की पुन्हा कधीही आपल्या घरी जात नाहीत. त्या रात्री ती कित्येक तास रडत राहिली.
दुसऱ्या दिवशी दुपारी तिची मैत्रीण चुजुको तिला भेटायला आली. तिने सादाकोसाठी काही रंगीबिरंगी कागद आणले होते. यापैकी एका कागदाचा तिने क्रौंच पक्षी बनवला. तो देत असताना चुजुको तिला म्हणाली की ही लवकर बरं होण्याची एक युक्ती आहे. सादाकोला समजेना की हे कागद आणि पक्षी तिला कसं काय बरं करणार. तेव्हा चुजुकोने सांगितले की क्रौंच पक्षी १००० वर्षे जगतो आणि जो कोणी १००० कागदी क्रौंच पक्षी स्वतःच्या हातांनी बनवेल त्याची एक इच्छा पूर्ण होते. सादाकोला जगण्याची खूप इच्छा होती. म्हणूनच अतिशय श्रद्धापूर्वक तिने त्या कागदाचे पक्षी बनवायला सुरुवात केली. प्रत्येक पक्षी बनवल्यावर ती म्हणत असे की तिला लवकर बरं वाटू दे. यादरम्यान अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये राहताना तिने पाहिले की कित्येक जण असह्य वेदना होऊन मृत्युमुखी पडत आहेत. कित्येक नवीन रुग्ण दवाखान्यात दाखल होत आहेत.
हे पहात असताना हळूहळू सादाकोची इच्छा बदलायला सुरुवात झाली. अशा प्रकारच्या यातना कोणालाच भोगाव्या लागू नयेत, संहारक युद्ध परत कुठेच होऊ नये अशी इच्छा ती व्यक्त करू लागली. दरम्यान हाती येणाऱ्या प्रत्येक कागदाचा पक्षी बनवण्याचा तिने जणू चंगच बांधला. एकेका पक्षात विश्वशांतीची तिची इच्छा अधिकच प्रबळ होत होती. कोणालाही भविष्यात अशा प्रकारच्या यातनांना सामोरे जावे लागू नये अशी प्रार्थना करत ६४४ पक्षी बनवल्यानंतर तिचा मृत्यू झाला. ही गोष्ट जेव्हा तिच्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना आणि इतर सर्व हितचिंतकांना समजली तेव्हा त्यांनी उर्वरित ३५६ पक्षी बनवले आणि त्या १००० कागदी क्रौंच पक्ष्यांचं दफन तिच्यासोबत करण्यात आलं.
तिच्या या शांतता प्रयत्नांची प्रेरणा घेऊन, अणुबॉम्बच्या परिणामांनी मृत्युमुखी पडणाऱ्या मुलांची आठवण म्हणून हिरोशिमा मधील शांतता केंद्रामध्ये सादाकोचा एक स्मृतीस्तंभ उभा केला आहे. त्यासाठी हजारो शालेय मुला-मुलींनी मदत केली. सादाकोची ही गोष्ट जगभरातील शालेय मुला-मुलींसाठी एक प्रेरणा ठरली असून आजही ६ ऑगस्ट या दिवशी जगभरातून लाखोंच्या संख्येने ओरिगामीचे क्रौंच पक्षी हिरोशिमाच्या जागतिक शांतता केंद्रामध्ये पाठविले जातात.
आजपासून मन लावून ओरिगामी शिकूया, ओरिगामीचे क्रौंच पक्षी बनवूया. या... शांतता प्रयत्नांमध्ये आपणही सहभागी होऊया. आपले शांत आणि समाधानाने प्रेरित जग आनंदाने नव्या पिढीच्या हाती सोपवूया.












Origami crane
A symbol of world peace


Origami crane
A SYMBOL OF WORLD PEACE


Origami crane
A SYMBOL OF WORLD PEACE


Origami crane
A SYMBOL OF WORLD PEACE
Origami for peace
Explore the joy of origami for everyone.
Origami School
Join us
+91-9423859848
© 2025. All rights reserved.